ठिबक सिंचनाचे ऊस पिकास आणि जमिनीस होणारे फायदे
नमस्कार शेतकरी बंधू-भगिनींनो,
यावर्षी पावसाचा ओघ पाहता येणाऱ्या वर्षी पाण्याची कमतरता भासण्याची दाट शक्यता असणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनी ऊस पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर करणे जास्त गरजेचे झाले आहे.
आता जून जुलै संपत आला तरी पाऊस पाहिजे त्या क्षमतेने झाला आणि बहुसंख्य शेतकऱ्यांनी उसाच्या लागणी ही केलेल्या आहेत. त्यामुळे पिकासाठी ठिबक सिंचन हा शिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे आपण या लेखामध्ये पाहणार आहोत की ठिबक सिंचनाचा वापर करून ऊस पिकाची जोपासना कशी करता येईल.
तर गळीत हंगाम 2023 साठी लागण व खोडवा उसाची शेती अतिशय काळजीपूर्वक करावी लागणार आहे राज्यामध्ये ऊस लागण आडसाली पूर्वहंगामी व सुरू हंगामामध्ये केली जाते या पिकाचा कालावधी अनुक्रमे 18 महिने, 15 महिने, आणि 13 महिने असतो. उसामध्ये उगवण जोमदार वाढ आणि पक्वता या प्रमुख वाढीच्या अवस्था आहेत उगवण व फुटव्याच्या अवस्था ऊस लागल्यानंतर 12 ते 16 आठवड्यापर्यंत होत असते.
उसासाठी ठिबक सिंचन वापरल्यास त्याच्या वाढीच्या अवस्थेत पाणी देणे शक्य होईल,भूगर्भातील पाण्याचा कार्यक्षम वापर आपल्याला करता येईल मुळे उपलब्ध असलेल्या पाण्यातून आपण एकापेक्षा जास्त पिके घेऊ शकाल.ऊस पिकास त्याच्या आवश्यकतेनुसार हवे तेवढे पाणी मुळाशी देणे शक्य होईल.
प्रवाही सिंचन पद्धतीची तुलना करता ठिबक सिंचनामुळे 50 ते 55 टक्के पाण्याची बचत होईल त्यामुळे पाण्यात ठिबक सिंचनाद्वारे दुप्पट किंवा तिप्पट क्षेत्र आपल्याला सिंचित करता येईल.
उसाच्या मुळाच्या कक्षेतील ओलावा व हवा याचे प्रमाण पीक वाढीच्या संपूर्ण कालावधीत संतुलन राखले गेल्याने ऊस उत्पादन क्षमता 30 ते 35 टक्क्यांनी वाढेल, नत्र व पालाश साठी अनुक्रमे युरिया व पांढरे म्युरेट ऑफ पोटॅश या पाण्यात विरघळणाऱ्या खताचा आणि फॉस्फरिक आम्लाचा वापर ठिबक द्वारे मुळाच्या कार्यक्षेत्रात करता येतो त्यामुळे खत मात्रेत बचत होईल.
पाण्याचा वापर ठिबक सिंचनाद्वारे कमी केल्यामुळे तनाचा प्रादुर्भाव कमी होईल तन नाशक किंवा खुरपणीचा खर्च ही वाचेल त्याचबरोबर कोणतीही जमीन असेल तर आपण ठिबक सिंचनाचा वापर करून पीक घेऊ शकतो त्यामुळे तुम्हाला जमीन सपाटीकरण किंवा बांधणीचा खर्च ही वाचतो.
ठिबक सिंचना बरोबर लागण व खोडवा पिकात पाचट आच्छादन करावे, पाचट कुजण्यासाठी युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, पाचट कुजवणे जिवाणू यांची प्रक्रिया करावी.त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहील व सेंद्रिय खत उपलब्ध होईल,यामुळे ऊस उत्पादन वाढीस मदत होईल.
खोडवा पिकामध्ये बुंदीची जमीन लागत छाटणी करून नांग्या भरून घ्याव्यात त्याचप्रमाणे उसास द्रव्य रुपी खताची फवारणी करावी.
कारखान्याने कृषी आणि कृषी विकास मार्फत कार्यक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर ठिबक सिंचन व पाचट आचरणासाठी खोडवा व्यवस्थापनासाठी खास प्रयत्न करणे गरजेचे आहे त्यातून येणाऱ्या गळीत हंगामासाठी ऊस मोठ्या प्रमाणात होईल व शेतकऱ्यांना फायदा होईल.
वर नमूद केल्याप्रमाणे ठिबक सिंचनाचे हे सर्व फायदे आहेत ठिबक सिंचन करून आपण पाण्याचा कमीत कमी वापर करूया आणि जमिनीतील पाणी उपसा जो होत आहे त्याला आळा घालू या त्यामुळे आमची विनंती आहे सर्व शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा जास्तीत जास्त वापर करावा आणि पाण्यात मिसळणारी द्रव्य खते वापरून जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे.
